महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अशोक चव्हाण आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अशोक चव्हाण हे आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे. त्यानंतर साडे बारा वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत. तसेच चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी काही आमदारही जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत.
15 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार होता. पण अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन मिळाले आहे. तसेच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात असून त्यानंतर ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करतील.