पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुबई येथे जागतिक सरकारांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष एंड्री राजोएलिना यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आणि प्राचीन भौगोलिक संबंधांचा उल्लेख केला. त्यांनी द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली आणि संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देशांमधील घनिष्ठ सहकार्याची प्रशंसा केली.
भारत-मादागास्करमधील भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि ‘सागर अर्थात या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’ या ध्येयदृष्टीसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. हिंद महासागर प्रदेशातील एक सहकारी विकसनशील देश म्हणून भारत मादागास्करच्या विकासाच्या प्रवासात एक वचनबद्ध भागीदार राहील, असे त्यांनी सांगितले.