मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तसेच कालपासून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते चिंतेत आले असून मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.
काल मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तरीही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. तर आज त्यांची प्रकृती आणखी नाजूक झाली आहे. आज त्यांच्या पोटात तीव्र वेदना होत असून त्यांना अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगेंना भोवळ आली. अन्न, पाणी, औषधे न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे.
प्रकृती खालावत असतानाही मनोज जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसेच आता त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे जरांगेंच्या सहकाऱ्यांनी त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला. त्यामुळे सहकाऱ्यांनी आग्रह करताच जरांगेंनी पाणी घेतले.
दरम्यान, मनोज जरांगे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात व्हावे, अशी मागणी जरांगेंनी केली आहे.