भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी गुजरातमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपिंदर पटेल आणि राज्यातील पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत जेपी नड्डा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जेपी नड्डा सध्या हिमाचल प्रदेशमधून राज्यसभा सदस्य आहेत.
द्वैवार्षिक राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने गुजरातसाठी चार उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये जेपी नड्डा यांच्याशिवाय भाजपने गुजरातमधून गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि जशवंतसिंह परमार या तीन नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
तसेच, भाजपने आगामी निवडणुकांसाठी ओडिशातील अश्विनी वैष्णव आणि मध्य प्रदेशमधून एल मुरुगन या केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह आणि पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यासह राज्यसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांची नावे दिली आहेत.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशसह 15 राज्यांच्या राज्यसभा निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. या तारखेला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 15 फेब्रुवारीपर्यंत नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. तसेच निवडणुकीचे निकाल त्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला जाहीर होतील.
निवडणूक आयोगाने 56 जागांसाठी द्विवार्षिक राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे, कारण सत्ताधारींचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे.