आयएसआयएसशी संबंधीत मॉड्यूलवर कारवाई
एनआयएकडून मोहम्मद जोहेब खान याला अटक
: राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे आज, गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 9 ठिकाणी छापेमारी केली. यावेळी आयएसआएस मॉड्यूलशी संबंधीत आरोपीला अटक करण्यात आलीय. या आरोपीने मोठ्या आस्थापनांना टार्गेट करण्याचे षडयंत्र आखले होते.
यासंदर्भातील माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरात गेल्या काही दिवसांपासून आयएसआयएस मॉड्यूलशी संबंधीत घडामोडी वेगाने घडत होत्या. यासंदर्भात आरोपी मोहम्मद जोहेब खान आणि त्याचे साथीदार गोपनीय पद्धतीने सक्रीय होते. आरोपी मोहम्मद जोहेब खान हा दहशतवाद्यांच्या आयएसआयएस मॉड्यूलचा सदस्य होता. तसेच अनेक आस्थापनांवर हल्ल्याचा कट त्याने रचला होता. एनआयएच्या पथकाने आज, गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात 9 ठिकाणी छापेमारी केली. यावेळी एनआयएच्या पथकाने आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटस जप्त केले. त्याचप्रमाणे मोहम्मद जोहेब खान याला अटक केली.
एनआयएच्या तपासानुसार, भारतासह इतर देशांमध्ये दहशतवादी नेटवर्कच्या कारवाया पुढे नेण्यासाठी आरोपी मोहम्मद जोहेब खान आणि इतर संशयित त्यांच्या दहशतवादी हँडलरच्या सतत संपर्कात होते. यासोबतच एनआयएला तपासात असे आढळले की आरोपी आपल्या संघटनेतील लोकांना हिंसक जिहाद, सीरियातील हिजरतशी संबंधित सामग्रीसह आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करत होते.