दिल्लीतील केमिकल गोदामांना भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. पेंट आणि केमिकल गोदामांना आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
दिल्लीतील अलीपूरमध्ये ही घटना घडली आहे. अलीपूरमधील अरूंद गल्ल्यांमध्ये असलेल्या पेंट आणि केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना राजा हरिश्चंद्र रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मृतांची ओळख अद्याप पटलेली नाहीये.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका घरात केमिकलचे ड्रम टाकून रंग तयार करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे तेथे आग लागली, तसेच ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूची चार घरे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आणि रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.