आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान शिवजयंतीच्या प्रमुख कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिले. यावेळी तिघांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. दरम्यान आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्याच्या विशेष अधिवेशनाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत महत्वाचे विधान केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एक विधान केले आहे. मनोगत व्यक्त करताना शिंदे म्हणाले, ”उद्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवले आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता, मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन सरकारने बोलावले आहे.”
काही दिवसांआधी राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा तयार झाल्याची माहिती समोर येत आहे. मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण मिळणार असल्याचे कळते आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या मसुद्याला मंजूरी मिळणार आहे. हा मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची मदत घेण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालात संपूर्ण राज्यात ३२ टक्के मराठा समाज असल्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. कुणबी समाज वगळून ३२ टक्के मराठा समाज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा नवीन करण्यात येणारा कायदा न्यायालयात टिकेल असे सरकारी तज्ज्ञांचे मत आहे.