शिवाजी महाराज आज्ञापत्रात आपली भूमिका मांडताना म्हणतात – परमेश्वर हाच सकल सृष्टीचा निर्माता आहे. त्यानेच राजाला निर्माण केले. राजाचे जे राज्य त्या राज्यात विविध प्रकारचे, विविध स्वभावाचे , विचारांचे, प्रकृतीचे, प्रवृत्तीचे, उपासनापंथाचे, लोक राहणार त्या सर्वांचे रक्षण करणारा आणि त्यांच्यात कलह, वाद , भांडणे , निर्माण झाली तर ती मिटवणारा आणि देशात शांतता प्रस्थापित करणारा राज्यकर्ता हवा. जो आपल्या प्रजेला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेणारा असला पाहिजे. प्रजेला स्वधर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही दडपणावाचून उपभोक्ता आले पाहिजे. प्रजेला पुत्रवत समजून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या राजाला भगवंताने राज्य दिलेले आहे. प्रजानुरंजन हे राजाचे ध्येय असावे. त्याने उन्मत्त आणि मदारूढ न होता राज्यकारभार करावा.
शिवरायांच्या लेखी असे राज्य निर्माण व्हावे हीच श्रींची इच्छा होय.
शिवरायांनी सज्जनांचे रक्षण, दुष्टदुर्जन,खलप्रवृत्तीचे निर्दालन करण्याच्या हेतूनेच हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेक शत्रु होते. दक्षिण प्रांतातला आदिलशहा, कुतुबशहा, जंजिरेकर सिद्दी, पोर्तुगीज , इंग्रज, डच
रामनगरकर , सोंधे, बेदनूर,आदी पाळेगार संस्थाने. त्याच बरोबर सह्याद्रीच्या आधाराने बलदंड होऊन बसलेले चंद्रराव मोरे, शिर्के, सावंत , दळवी, निंबाळकर, घाटगे अशी वतनदार मंडळी ! आणि उत्तरेला असलेले मोगलांचे बलाढ्य साम्राज्य !
या सर्वांशी शिवरायांना संघर्ष करावाच लागला. हा संघर्ष अटळ होता. हा संघर्ष करताना शिवरायांनी एक विशिष्ट धोरण निश्चित केले होते, ते असे….
१. आपल्या समोरचा शत्रु पराक्रमी आहे. त्याच्याकडे भरपूर युद्ध सामग्री आहे. त्याचे बुद्धिवैभवही श्रेष्ठ आहे. तरीही त्याचे दडपण आपण घ्यायचे नाही.
२. अनेक वेळा सरळ सरळ आक्रमण करून त्यांच्यावर वचक बसवायचा.
३. शत्रूला बेसावध ठेवायचे आणि त्याच्यावर अचानक हल्ला करायचा.
४. आपल्या शत्रूमध्ये परस्पर कलह लावून द्यायचा.
५. भेदनीती चे तंत्र अनुसरायचे.
६. कधीकधी शत्रूच्या छावणीत अचानक घुसून त्याच्याशी युद्ध करायचे.
७. शत्रूला कोंडीत गाठून पराभूत करायचे. कधी शत्रूच्या भेटीला जायचे. तर कधी शत्रूला स्वतःच्या भेटीस बोलवायचे.
८. जलदुर्गांची निर्मीती करुन आरमार दल उभे करायचे. नकाशे तयार करायचे.
९. शत्रूची अधिकाधिक हानी करण्याचे धोरण ठेवणे राष्ट्रहिताला बाधा होणार नाही याची काळजी घ्यायची. विविध ठिकाणी गड-किल्ले उभे करायचे. सैन्यात हौतात्म्याची ओढ निर्माण न करता विजयाची ओढ निर्माण करायची.
शिवरायांनी एकाच वेळी सर्व शत्रूंना स्वतःच्या अंगावर उडवून घेतले नाही प्रत्येक वेळी वेगवेगळे डावपेच वापरले एकदा जी खेळी वापरली त्या खेळीचा पुनश्च वापर केला नाही शत्रूला स्वतःच्या अटकळ बांधता येणार नाही याची काळजी शिवरायांनी नेहमीच घेतली. स्त्री जातीचा अपमान होईल असे वर्तन त्यांनी कधीही केले नाही. इतरांना करू दिले नाही. परस्त्री मातेसमान ही आपल्या संस्कृतीची शिकवण त्यांनी सामान्य जनतेच्या मनात आणि बुद्धीत रुजवली. स्त्रीचा अपमान करणाऱ्याला कठोर शासन करताना त्याने मागे पुढे पाहिले नाही.
शिवरायांचे राजकीय धोरण आणि युद्धतंत्र सर्वात अव्वल दर्जाचे होते तिला श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नीतीचा पाया होता शिवरायांनी युद्धात स्त्री-पुरुष, मुले यांना पकडून गुलाम बनवणे त्यांची विक्री करणे अशा अमानवीय प्रथा त्या काळात होत्या, त्या लाथाडल्या. एवढेच नव्हे तर अशाप्रकारे माणसांची खरेदी विक्री करणाऱ्या शत्रूला प्रतिबंध केला. त्याच्यावर आपला धाक निर्माण करून वचक बसवला .
शिवराय औरंगजेब बादशाहाला भेटायला आग्र्याला गेले तिथे त्यांना औरंगजेबाने बंदी बनवले हे संकट भोसले कुळावर आले आहे असे जनतेला वाटले नाही, तर जनतेला हे स्वतःवरचे संकट वाटले. जनतेने शंभुराजांची सर्व व व्यवस्था स्वतःचे दयित्व समजून केली. त्यांना पुनश्च सुखरूप स्वराज्यात आणले.
मोगलांच्या राज्यात तोतये निर्माण झाले होते. औरंगजेबाच्या भावांचे तोतया अनेक वेळा निर्माण झाले. त्यामुळे औरंगजेब सतत मानसिक दडपणाखाली वावरत होता. शिवरायांच्या काळात एकही तोतया निर्माण झाला नाही. पेशवाईच्या काळात तोतया निर्माण झाले होते शिवरायांच्या या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीला जनतेचा पूर्ण पाठिंबा आणि सहभाग होता. हा शिवरायांच्या राजकीय धोरणाचा विजय होता.
शिवरायांनी प्रसंगानुरुप स्वतःचे तोतया निर्माण केले. असा प्रकार परकीय इस्लामिक आक्रमकांच्या साम्राज्यात कुठेही आढळत नाही. याचा अर्थ शिवरायांची प्रशासनावर घट्ट पकड होती. त्यांच्या प्रशासनाला जनतेचा सक्रिय पाठिंबा होता.
– दुर्गेश जयवंत परुळकर (९८३३१०६८१२)