केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी बुधवारी सांगितले की, केंद्र सरकार पंजाबच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ‘संवादातून’ तोडगा काढण्याचे आवाहन करतानाच कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना चर्चेच्या पाचव्या फेरीचे निमंत्रण दिले आहे.
बुधवारी एएनआयशी बोलताना अर्जुन मुंडा म्हणाले, “चौथ्या फेरीनंतर सरकार पाचव्या फेरीत एमएसपी, पीक विविधता, एफआयआर यांसारख्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. मी पुन्हा शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो.”
“मी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करतो आणि आपण चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. तसेच चर्चेने पुढे जाण्याचे आवाहन करताना शेतकऱ्यांनी अद्याप निमंत्रणाला प्रतिसाद दिलेला नाही”, असे मुंडा यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “अद्याप शेतकऱ्यांच्या बाजूने कोणताही प्रतिसाद आलेला नाही. आम्ही आवाहन करतो की त्यांनी चर्चेसाठी पुढे यावे आणि त्यांची भूमिका मांडावी. सरकारलाही पुढे जाऊन तोडगा काढायचा आहे.”
पीयूष गोयल आणि नित्यानंद राय यांच्यासह शेतकरी नेत्यांशी चर्चा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या टीममध्ये मंत्री मुंडा यांचा समावेश आहे.
आदल्या दिवशी, पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंढेर यांनी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या कायदेशीर हमीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि शांततापूर्ण मार्गाने पुढे जाण्याचे आश्वासन दिले.
तसेच बुधवारी ‘दिल्ली चलो’ आंदोलन पुन्हा सुरू झाल्याने केवळ नेतेच देशाच्या राजधानीकडे कूच करणार असल्याचे शेतकरी नेते म्हणाले.”आम्ही ठरवले आहे की कोणताही शेतकरी, तरुण पुढे जाणार नाही. नेते पुढे जातील. आम्ही आमच्या सैनिकांवर हल्ला करणार नाही. आम्ही शांततेने जाऊ. जर त्यांनी (केंद्र सरकारने) एमएसपीवर कायदा केला तर हे सर्व संपुष्टात येईल,” असे सर्वन सिंग पंढेर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
दरम्यान, चौथ्या फेरीतील चर्चेचा गोंधळ संपल्यानंतर बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा सुरू केला आहे. 19 फेब्रुवारी रोजी, शेतकरी नेत्यांनी केंद्राचा एमएसपी खरेदीचा प्रस्ताव नाकारला आणि तो “शेतकऱ्यांच्या बाजूने नाही” असे म्हटले गेले.