‘बिग बॉस 16’ चा स्पर्धक शिव ठाकरे याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. शिव ठाकरे सोबतच अब्दु रोजिक याला देखील ई़डीने नोटीस पाठवली आहे. एका हाय- प्रोफाईल मनी लॉन्ड्रींग प्रकरणात साक्ष देण्यासाठी त्या दोघांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अली असगर शिराझी या व्यक्तीची हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी होती. ही कंपनी वेगवेगळ्या स्टार्टअप्सना फायनान्स पुरवण्याचे काम करत होत. या स्टार्टअपमध्ये शिव ठाकरे याच्या ‘ठाकरे टी अँड स्नॅक्स’ या रेस्टॉरंटचा आणि अब्दु रोजिकच्या ‘बर्गीर’ या फास्ट फूड स्टार्टअपचा समावेश होता. त्यामुळे आता या दोघांनाही ईडीने समन्स बजावले आहे.
हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नार्को फंडिंगच्या माध्यमातून पैसे कमावल्याचा आरोप आहे. अली असगरने हे पैसे हसलर्स हॉस्पिटॅलिटी या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक म्हणून देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच असगरने स्टार्टअपमध्येही मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती मिळताच शिव आणि अब्दुने हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबतचे कंत्राट रद्द केले. पण तरीही या दोघांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.