पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खनौरी सीमेवर शहीद झालेले शेतकरी शुभकरन सिंह यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई आणि त्यांच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी येथे बुधवारी झालेल्या चकमकीत शुभकरन सिंह (21) हा भटिंडा येथील शेतकरी ठार झाला तर 12 पोलीस जखमी झाले होते.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, “खनौरी सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शुभकरन सिंह यांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकार 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार आहे आणि त्यांच्या लहान बहिणीला सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”
शेतकरी शुभकरन सिंह यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी शेतकरी नेते करत होते. याशिवाय शेतकऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
तसेच शुभकरन सिंह यांना ‘शहीद’ दर्जा देण्याची मागणीही शेतकरी नेत्यांनी केली होती. शुभकरन सिंह हे भटिंडातील बल्लो गावचे रहिवासी होते. सिंह यांचा मृतदेह पतियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात ठेवण्यात आला होता, परंतु शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्याने शवविच्छेदनास उशीर झाला होता.
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा (KMM) केंद्र सरकारवर पिकांच्या किमान आधारभूत किंमतीवर कायदेशीर हमी आणि शेती कर्जासह त्यांच्या मागण्यांसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान, शुभकरन सिंह यांच्या निधनानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी दोन दिवस मोर्चा थांबवला होता.