काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात टिपण्णी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. आता या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. 2018 साली काँग्रेसच्या पूर्ण अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपविरोधात भाषण केले होते आणि शाह यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. यानंतर राहुल गांधींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ट्रायल कोर्टमध्ये सुरू असलेली कारवाही रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राहुल गांधींकडून 16 फेब्रुवारी रोजी लिखीत बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. त्यानंतर जस्टिस अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.