पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर पुन्हा जोरदार हल्ला करताना, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी आज संदेशाखाली येथील कथित भयंकर घटनांवरील वादाच्या दरम्यान मालदा जिल्ह्यातील पुन्हा घडलेल्या एका ताज्या बलात्काराच्या घटनेचा उल्लेख केला आहे.
“संदेशखाली असो किंवा मालदा, बंगालमध्ये एकही महिला सुरक्षित नाही. क्रूर बलात्कार आणि हत्येच्या दुसऱ्या प्रकरणात, जुन्या मालदा विधानसभेच्या भाबुक गावात वीटभट्टीमध्ये नववी वर्गातील एक आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनी, वाईट अवस्थेत मृत परिस्थितीमध्ये सापडली आहे ,” असे पूनावाला यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हंटले आहे. ममता बॅनर्जी या अश्या हिंसाचाराच्या घटनांना जबाबदार आहेत.त्यांनी बंगालच्या प्रत्येक गावाला संदेशाखाली बनवले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मृत मुलीच्या घरच्यांशी याबाबत संपर्क साधला असता ती गुरवार रात्रीपासून घरी न आल्यामुळे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचे सांगितले.तसेच या दुर्दैवी घटनेची माहिती कळल्यानंतर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
‘बलात्काऱ्यांना संरक्षण दिले जात आहे’ असा आरोप करत पूनावालानी जिल्ह्यांमध्येही इतरत्रही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचा दावा केला. “बंगालमध्ये अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत, परंतु शाहजहान आणि बलात्काऱ्यांना उदात्त बनवत संरक्षण दिले जात आहे आणि त्याविरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जाते ! ही तृणमूल काँग्रेसची तालिबानी मानसिकता आणि संस्कृती असल्याचे पूनावाला यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे.
दरम्यान, येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी टीएमसीचे शिष्टमंडळ संदेशाखाली येथे दाखल असून TMC नेते आणि पश्चिम बंगालचे मंत्री सुजित बोस म्हणाले आहेत की, “आम्ही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथे आलो आहोत. जाळपोळीच्या घटनेच्या संदर्भात काही काम चालू आहे. आम्ही त्यावर देखरेख करण्यासाठी येथे आहोत आणि नंतर तुम्हाला अधिक माहिती देऊ. .”
टीएमसी नेता शेख शाहजहान आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या कथित अत्याचाराविरोधात संदेशाखाली मधले वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. संदेशखालीतील मोठ्या संख्येने महिलांनी तृणमूल काँग्रेसचा प्रबळ नेता शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांवर जबरदस्तीने “जमीन बळकावणे आणि लैंगिक अत्याचार” केल्याचा आरोप केला आहे. शाहजहान सध्या फरार असून राज्य पोलीस आणि केंद्रीय एजन्सी त्याला शोधण्यात अक्षम आहेत.