लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात, महाराष्ट्रात आणि देश पातळीवर इंडिया आघाडीच्या आघाडीची मोर्चेबांधणी चालू आहे. तर महायुतीनेही प्रत्येक मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. महायुतीची पुणे मतदारसंघात जोरदार तयारी चालू आहे. गेल्या १० वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश बापट हे या मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी बापट यांचं निधन झालं. त्यानंतर हा मतदारसंघ रिक्त आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपातील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक नेते प्रयत्न करत आहेत. भाजपाचे माजी खासदार संजय काकडे हेदेखील या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, काकडे यांनी पुणे भाजपाच्या गोटात काय चाललंय याबाबतची माहिती दिली आहे. संजय काकडे म्हणाले, संपूर्ण भारतात आय.एन.डी.आय.ए. आघाडी लोकसभेची तयारी करत असली तरी त्यांच्या या तयारीचा त्यांना काहीच फायदा होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत आणि त्यांची देशात जी प्रतिमा तयार झाली आहे, ती पाहता आणि तरुण वर्गाला मोदींचं जे आकर्षण आहे ते पाहता आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीचा सुपडा साफ होईल. आपल्या देशातील तरुणांना विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी करून दाखवतील. दुसऱ्या बाजूला आय.एन.डी.आय.ए. आघाडीच्या असण्याने भाजपाला काहीच फरक पडणार नाही.