अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास केला. त्यांनी मुंबईतील घाटकोपर ते ठाण्यातील कल्याण असा लोकल ट्रेनमधून प्रवास केला.
30 किलोमीटरच्या प्रवासात निर्मला सीतारामन यांनी सहप्रवाशांशी संवाद साधला. यावेळी अर्थमंत्र्यांना पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक दिसत होते. तसेच अनेकांनी सीतारामन यांच्यासोबत सेल्फीही काढले. तसेच या भेटीची काही छायाचित्रे अर्थमंत्र्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स (BITS) पिलानीच्या पाचव्या कॅम्पसचे उद्घाटन केले. यासोबतच व्यवस्थापन आणि डिझाइन अभ्यासक्रमांचाही या संस्थेत समावेश करण्यात आला आहे.
संस्थेचे समूह अध्यक्ष आणि कुलपती कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, कल्याण परिसरात असलेले कॅम्पस 60 एकरमध्ये पसरलेले आहे. या कॅम्पसची पूर्ण क्षमता 5,000 विद्यार्थी आहे. 1964 मध्ये राजस्थानच्या मारवाड भागातील बिर्ला यांच्या मूळ गावी पिलानी येथे सुरू झालेल्या या संस्थेचे पिलानी, गोवा, हैदराबाद, दुबई आणि कल्याण या पाच कॅम्पसमध्ये 80,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.