उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू होते. तर आज तब्बल 24 दिवसांनंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबतची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
2 फेब्रुवारी रोजी गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड आणि त्यांचा सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. जमिनीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला होता. तर या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर या दोघांना तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आज महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी गायकवाड यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. तसेच शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच आज संध्याकाळी महेश गायकवाड यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आज ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.