प्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. आपल्या जादूई आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पंकज उधास यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
गझल गायकीच्या क्षेत्रात पंकज उधास यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी 1980 मध्ये ‘आहत’ नावाच्या अल्बमच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. तर त्यांची महफिल, मुकरार, तरन्नम अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत. पंकज उधास यांनी गायलेली गाणी, गझल आजही तितकीच लोकप्रिय असून ती संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत.
पंकज उधास यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांचे ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. तसेच पंकज उधास यांना 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
दरम्यान, पंकज उधास यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातून आणि सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.