दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच जरांगेंकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली होती. त्यानंतर मनोज जरांगेंवर अनेक सत्ताधारी नेत्यांनी जोरदार टीका केली. तर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करा, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. अशातच आता जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल माफी मागितली आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, माझे आमरण उपोषण सुरू होते त्यावेळी माझ्याकडून अनावधानाने झाले होते. मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. जर दिल्या असतील तर त्यांनी ते विधानसभेत घेतलं असं मला कळलं. ते विधानसभेच्या पटलावर बोलले असतील, मी बाहेरून ऐकले आहे. मी आई-बहिणीवरून बोललेले शिंदे यांनाही लागले असेल तर तेवढे शब्द मी मागे घेतो.
आपल्याला आई-बहिणींपेक्षा मोठे काय आहे? आपण छत्रपतींचे विचार चालवणारे आहोत. तसेच जर आई-बहिणींबद्दल माझ्या तोंडातून अनावधानाने शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागे घेतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले. जरांगेंच्या विधानामागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. तर हीच मागणी प्रवीण दरेकर यानी विधानपरिषदेत केली आहे.
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कोणी ठरवले? ही फक्त धमकी आहे का? यामध्ये संशय आहे का? की यात कोणी कट कारस्थाने केली आहेत? असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले. तसेच जरांगेंच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाची बदनामी होत आहे, त्यामुळे शांत बसू नका, असेही आशिष शेलार म्हणाले.
जरांगेंनी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात भाषा वापरली ती योग्य नाही. यामध्ये तुला निपटून टाकू, अशी भाषा जरांगेंनी वापरली आहे. तसेच तुम्हाला शेवटची संधी देतो, असेही ते म्हणाले. हे चाललंय तरी काय? असा सवाल करत आशिष शेलार यांनी जरांगेंच्या मागून नेमके कोण बोलत आहे याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
तर दुसरीकडे विधानपरिषदेत प्रवीण दरेकर हे देखील जरांगेंविरोधात आक्रमक झाले होते. जरांगेंच्या विधानामागे नेमके कोण आहे? याची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी दरेकरांनी केली. तसेच धमक्या देणाऱ्या जरांगेंना अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.