गुजरातच्या पोरबंदर येथे 3 हजार किलोंचं ड्रग्ससह चौघांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) भारतीय नौदल आणि एनसीबीने ही संयुक्त कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरून बोटीतून अंमली पदार्थ गुजरातमध्ये आणले जायचे अशी माहितीही पुढे आली आहे.
गुजरातच्या समुद्री किनरपट्टीवर अंमलीपदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पंजाब सीमेवर ड्रोन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी केली जात असे. परंतु, बीएसएफच्या सतर्कतेमुळे या तस्करीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे. त्यामुळे ईराण आणि अफगाणिस्तानातून भारतात अंमली पदार्थ पोहचवण्यासाठी गुजरात समुद्री किनरपट्टीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना साथरोगाच्या काळात तस्करांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले. यापूर्वी गुजरातच्या मुद्रा बंदरावर अनेकदा मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आता तस्करांनी पोरबंद किनरपट्टीच्या माध्यमातून तस्करी सुरू केली आहे. सुरक्षा यंत्रणा या तस्करीवर बारीक नजर ठेवून होत्या. अशातच गुजरात एटीएस आणि एनसीबीला ड्रग्ज तस्करीची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) यांच्या मदतीने तस्करांच्या विरोधात मोहिम हाती घेण्यात आली. या कारवाईत पोरबंदरच्या समुद्रातून तस्करांची बोट जप्त करण्यात आली. यात 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 3 हजार किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. या अंमली पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चरसचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे