भाजप नेते निलेश राणे यांच्या पुण्यातील मालमत्तेवर महानगर पालिकेने कारवाई केली आहे. डेक्कन भागामध्ये असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने ही जागा पालिकेने सील केली आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. या जागेवर तब्बल 3 कोटी 77 लाख 53 हजार रूपयांची थकबाकी होती.
महानगर पालिकेच्या या कारवाईवर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी ही कारवाई केली. यामध्ये काहीही गैर नाही. आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार आहोत, असे नितेश राणे म्हणाले.
डेक्कन कॉर्नर येथे निलेश राणेंच्या मालकीचा मॉल आहे. तसेच तीन मजल्यांवरील दुकानांवर थकबाकी होती. तर या मॉलची एकूण 5 कोटी 60 लाख रूपये थकबाकी होती. याबाबत पुणे महापालिकेने वारंवार पाठपुरवठा केला होता. तसेच नोटीसही पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही कर भरण्यात आला नव्हता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महानगरपालिकेकडून अशा पद्धतीच्या कारवाया सुरू आहेत. जेथे कोट्यावधी कर थकीत आहे, त्यांच्यावर अशी कारवाई केली जात आहे.