गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण हे सतत बदलतना दिसत आहे. राज्यासह देशातील हवामान देखील बदलताना दिसत आहे. कुठे पाऊस, कुठे गारपीट, कुठे बर्फवृष्टी तर, कुठे कडक उन्हाळा पाहायला मिळतो आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशासह राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये देशासह महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेले दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याचे समोर आले आहे. आज व उद्या अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. १ मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात देखील निसर्ग कोपला असल्याचा पाहायला मिळाले. जोरदार विजांसह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. इकडे अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील झाडे बाजूला हटविण्याचे काम सुरु होते. वादळी वारे आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, भाजीपाला आणि आंबा पिकाला मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. राज्यातील हवामानात सतत बदल होत आहेत. काही ठिकाणी कडक उन्हाळा, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात देखील तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.