देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आपल्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. तो त्याची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च या कालावधीत प्री-वेडिंगचे काही कार्यक्रम होणार आहेत. प्री-वेडिंगचे हे कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य होणार असून, तिथे खानपानाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या बहुप्रतिक्षित प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये बॉलिवूड स्टार्ससह अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. गुजरातमधील जामनगर शहरात प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवस चालणाऱ्या या प्री-वेडिंग सोहळ्यात पाहुण्यांना एकूण 2500 वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी चाखायला मिळणार आहे. यामध्ये सकाळी 70 पेक्षा जास्त पदार्थांचे पर्याय असतील, तर दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात प्रत्येकी 250 पेक्षा जास्त पर्याय असतील. तसेच शाकाहारी पदार्थांच्या निवडीसह शाकाहारी पाहुण्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
मेनूमध्ये इंदौर, पारसी, थाई, मेक्सिकन आणि जपानी तसेच पॅन-आशियाई पदार्थांचा समावेश असणार आहे. तसेच या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी 25 हून अधिक शेफची टीम इंदूरहून जामनगरला येणार आहे, ज्यांचे लक्ष इंदौरी पदार्थ तयार करण्यावर असणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी येणाऱ्या पाहुण्यांना इंदौरी फूड चाखायला मिळेल. इंदौरच्या खाद्यपदार्थांसाठी एक विशेष सराफा काउंटर तयार केला जाईल, ज्यामध्ये इंदौरचे सर्व लोकप्रिय खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. या काउंटरमध्ये इंदौरच्या प्रसिद्ध मिठाई, नमकीन, मसालेदार चाट आणि कचोरी यासह अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश असणार आहे.