अवैध उत्खनन प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना CBI ने नोटीस पाठवली आहे. अवैध उत्खनन प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयने नोटीस पाठवली असून त्यांना आज (29 फेब्रुवारी) चौकशीसाठी बोलावले आहे.
सीबीआयने गौण खनिज घोटाळ्याच्या चौकशीसाठी अखिलेश यादव यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. तर आता अखिलेश यादव यांनी सीबीआयच्या चौकशीसाठी दिल्लीला जाण्यास असमर्थता दर्शवली आहे. ते म्हणाले की, चौकशीसाठी थेट जाणं होणार नसलं तरी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहील. तसे उत्तर अखिलेश यादव यांनी सीबीआयकडे पाठवलेले आहे.
पुढे अखिलेश यादव यांनी त्यांच्यावरील कारवाईवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी 2019 मध्ये एफआयआर दाखल झालेला होता. मग गेल्या पाच वर्षात या प्रकरणी कोणतीही माहिती का घेतली गेली नाही? आता अचानक सीबीआयने लोकसभा निवडणूकीपूर्वी नोटीस पाठवली आहे. पण तरीही मी या चौकशीसाठी सहकार्य करेन, असे अखिलेश यादव म्हणाले.
दरम्यान, अखिलेश यादव हे 2012-13 मध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गौण खनिज खाते होते. त्यावेळी अवैध उत्खननाबाबत गंभीर आरोप झाले होते. तर 2016 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.या प्रकरणात माजी मंत्री गायत्री प्रजापती यांचे नाव समोर आले होते. तर या प्रकरणात अखिलेश यादव सरकारमध्ये अनेक जिल्ह्यांच्या डीएम राहिलेल्या बी चंद्रकला यांचेही नाव समोर आले होते आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती.