देशातील वातावरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, थंडी तर, काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात असलेल्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कुठे पाऊस, कुठे गारपीट, कुठे बर्फवृष्टी तर, कुठे कडक उन्हाळा पाहायला मिळतो आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशासह राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, जोरदार गारपीट देखील झाली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये दाट धुके पसरण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि ऊत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. १ आणि २ मार्च रोजी अलर्ट देण्यात आला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील २ ते ३ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला होता. विदर्भ मराठवाड्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ऐन थंडीत पाऊस झाल्याने नागरीकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर, जालन्यातील भोकरदन तसेच अन्य काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी राजा आता संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान झाले असू, नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.