अदानी समूह मध्य प्रदेशमध्ये 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल आणि राज्यात आपली गुंतवणूक वाढवेल, असे अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे संचालक प्रणव अदानी यांनी सांगितले आहे. प्रणव अदानी यांनी उज्जैन येथील प्रादेशिक उद्योग परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलताना सांगितले की, राज्यात आपली गुंतवणूक दुप्पट करण्याचा अदानी समूहाचा मानस आहे.
प्रणव अदानी पुढे म्हणाले की, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की केवळ अदानी समूह या विविध क्षेत्रांमध्येच गुंतवणूक करत राहणार नाही, तर आम्ही मध्य प्रदेशमध्ये आमची गुंतवणूक दुप्पट करू आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या नम्र मार्गाने योगदान देऊ. आम्हाला विश्वास आहे की तुमचे दूरदर्शी नेतृत्व आम्हाला मध्य प्रदेशमध्ये अंदाजे 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सक्षम करेल. त्यापैकी 5,000 कोटी रुपये या महान शहरातून उज्जैन ते भोपाळ मार्गे इंदूरपर्यंतचा महाकाल एक्सप्रेस वे तयार करण्यासाठी वापरला जाईल.”
प्रणव अदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, या देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी पंतप्रधान कठोर परिश्रम घेत आहेत. “मध्य प्रदेश हे देशाचे हृदय आहे आणि भविष्य मध्य प्रदेशचे आहे हे सांगण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही. आपले दिग्गज पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. हे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच डॉ.मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश ही वचनबद्धता पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
चोरागडी येथे वार्षिक 4 दशलक्ष टन क्लिंकर युनिट आणि देवास आणि भोपाळ येथे 8 दशलक्ष टन एकत्रित क्षमतेचे दोन सिमेंट ग्राइंडिंग युनिट स्थापित करण्यासाठी समूह 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असेही प्रणव अदानी यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की, “नैसर्गिक संसाधनांच्या क्षेत्रात आम्ही अन्न प्रक्रिया, लॉजिस्टिक आणि कृषी-लॉजिस्टिक्स आणि संरक्षण उत्पादनात आमची उपस्थिती वाढवण्यासाठी 4,000 कोटी रुपये आणि आणखी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत.”
प्रणव यांनी पुढे दावा केला की, सुमारे 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे मध्य प्रदेशातील विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये 15,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
दरम्यान, मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आजपासून प्रादेशिक इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह नावाच्या दोन दिवसीय गुंतवणूकदार समिटला सुरुवात झाली आहे. हा उपक्रम भोपाळ, उज्जैन आणि इंदूरसह राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. 56 प्रकल्पांमध्ये 74,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे 17,000 हून अधिक व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
सध्या, इंडस्ट्री कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेल्या 35 कंपन्यांनी एकूण 74,711 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवली आहे. कॉन्क्लेव्ह दरम्यान हा आकडा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला 800 हून अधिक गुंतवणूकदार उपस्थित राहणार असून, 30 विदेशी प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. MOU स्वाक्षरीसाठी केवळ मोठ्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याऐवजी, सरकार शक्य तितके प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यावर भर देत आहे. त्यानुसार त्वरित गुंतवणूक करण्यास तयार असलेल्या कंपन्या आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्राधान्य दिले जात आहे.