मुंबईवर झालेल्या २००८ मधील दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी अजूनही आठवल्या तरी काळजात चर्रर्र होते. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राम गमवावे लागले होते. सुरक्षा दलांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याने कसाब नावाचा दहशतवादी जिवंत पकडला. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. मात्र आता पाकिस्तानमधून एक बातमी समोर येत आहे. मुंबईवरील हल्ल्यामध्ये अनेक सूत्रधार होते. त्यातील एका सूत्रधाराचा मृत्यू झाला आहे.
लष्कर- ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा इंटेलिजन्स प्रमुख आझम चिमाचा मृत्यू झाला आहे. ७० व्या वर्षी त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचा मृत्यू हार्ट अटॅक आल्यामुळे झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र त्याच्या मृत्यूबद्दल पाकिस्तानमध्ये संशयाचे वातावरण आहे. खरेच त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे याबाबत लष्कर-ए-तोयबा संघटनेमध्ये संशय निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संशयास्पदरित्या मारले गेले आहेत. त्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबईवर २६ नोहेंबर २००८ मध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानमधून समुद्रमार्गे घुसून दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. मात्र त्या हल्ल्यातील एक दहशतवादी, हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असणारा आझम चिमाचा मृत्यू झाला आहे. अशा दहशतवाद्यांच्या मृत्यूमुळे अनेक दहशतवादी हे या हल्ल्याशी संबंधित आहेत ते अजूनही पाकिस्तानमध्येच असल्याचे स्पष्ट होत आहे.