आरोग्याच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती मिळावी, या मागणीसाठी आसाराम बापूंनी केलेली शिक्षा माफीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उलट या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूंच्या वकिलाला राजस्थानच्या उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.
आसाराम बापूंची बाजू मांडणारे वकील राजेश इनामदार यांनी सांगितले की, आसाराम बापू या खटल्यात ११ वर्षे ७ महिन्यांहून अधिक काळ शिक्षा भोगत आहेत. त्यांना हृदयविकार, अति थायरॉईड, आतडे व जठरात रक्तस्रावासह अशक्तपणा, सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोविड-न्यूमोनिया आणि यूरोसेप्सिस यांसह अनेक आजारांनी ग्रस्त आहे. त्यांच्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा कमी होत आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यांचा तुरुंगातच वेदनादायी मृत्यू होण्याची भीती आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर विचार करण्यास न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने नकार दिला. तसेच आसाराम बापूंच्या वकिलांना राजस्थान उच्च न्यायालयात आपली मागणी मांडण्यास सांगितले. सोबतच राजस्थान उच्च न्यायालयाला ही याचिका त्वरित निकाली काढण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आसाराम बापूंना २०१८ मध्ये बलात्कारासह अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.