पाकिस्तानच्या नवनिर्वाचित संसदेत पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांना सहज बहुमत मिळाले आहे. दोन्ही पक्षांनी एकमताने शेहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी शेहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे.
शेहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. आता ते सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे उमेदवार म्हणून 72 वर्षीय शेहबाज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 336 सदस्यांच्या सभागृहात त्यांना 201 मते मिळाली आहेत.
शाहबाज यांचे प्रतिस्पर्धी आणि तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या वतीने उमर अयुब खान यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परंतु, त्यांना 336 सदस्यांच्या सभागृहात केवळ 92 मते मिळाली. तर पीटीआयच्या अपक्ष समर्थकांनी 93 जागा जिंकल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये संसदेचे नवे अधिवेशन बोलावण्यात आल्यानंतर पीटीआयला पाठिंबा दिलेल्या खासदारांनी गदारोळ केला. या सर्व परिस्थितीमध्ये शेहबाज यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. तर आता शेहबाज शरीफ हे सोमवारी राष्ट्रपती भवन ऐवान-ए-सदर येथे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.