सातारा, 3 मार्च : श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्री सध्या दास नवमी महोत्सवाचा मोठ्या प्रमाणात उत्साह चालू आहे. श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवांमध्ये शनिवारची संध्याकाळ एकाच कार्यक्रमात गायन, नृत्य आणि समर्थ रामदास स्वामींच्या एकपात्री प्रयोगांनी साकारली गेली.
प्रथम सत्रात सांगली येथील गायक अभिषेक प्रकाश काळे यांनी अतिशय सुरेख अशा अभंगवाणीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पं. जयतीर्थ मेहुंडी यांचेकडे दहा वर्षाची गायन शिक्षण घेत सध्या पं. शरद बापट यांचे कडे अभिषेक गायनाचे धडे घेत आहेत. सध्या ते आकाशवाणी बी ग्रेडचे आर्टिस्ट असून छोटा गंधर्व, बालगंधर्व, महाराष्ट्र शासनाचा गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कोर्टाच्या निकालानंतर गायनाचा पाहिला कार्यक्रम अयोध्या येथील श्रीराम मंदिरात करणारा हा कलाकार अतिशय अल्पवयात सुप्रसिद्ध झाला आहे. तसेच देशभरात व विदेशात त्यांची गायन कार्यक्रम आत्तापर्यंत सादर झालेले आहेत.
आपल्या गायन कार्यक्रमाची सुरुवात अभिषेक यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी…’ या नाममंत्रांनी करत त्यानंतर समर्थांच्याच ‘आरंभी वंदीन आयोध्येचा राजा…’ या अभंगाला अतिशय सुरेख आळवले. ‘जय शंकरा गंगाधरा…’ असे सादर करून ‘मन राम रंगी रंगले…’, ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली…’, ‘जोहार मायबाप जोहार…’ म्हणत ‘निर्भय निर्गुण…’ हे आगळ्यावेगळ्या धाटणीचे भजन सादर करून कानडी भाषेतील ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’ हे लक्ष्मीचे स्तवन करत ‘रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या…’ या पदाला आळवत ‘ध्यान करू जाता मन हरपले…’ सादर करून आपल्या गायन सेवेची सांगता केली.
अभिषेक काळे यांना ठाणे येथील तबलावादक सुहास चितळे यांची सुरेख साथ मिळाली, तर पखवाज साथ गणेश मेस्त्री यांची होती. ऑर्गनवर सुशील गद्रे व ताल वाद्यांसाठी राहुल आडुळकर यांची सुरेख साथ संगत झाली. या कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्य वैष्णवी बेलापूरकर यांनी बहारदार असे भरतनाट्यम सादर करत यामधून श्रीरामाची स्तुती उपस्थित प्रेक्षकांपुढे सादर करताना अभिनय व नृत्याचे अतिशय सुरेख दर्शन उपस्थितांना घडविले.
रात्री नऊ वाजता दामोदर बुवा रामदासी यांच्या समर्थ रामदास स्वामी यांचे वरील एकपात्री प्रयोगाला प्रारंभ झाला. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी हा राष्ट्र व धर्म जागृतीचा प्रेरणादायी एकपात्री प्रयोग उपस्थितांना अधिकच भावला, समर्थ रामदास स्वामींचे जाज्वल्य आणि मार्गदर्शक विचार समर्थांनी केलेले भारतभ्रमण, गावोगावी केलेली बलोपासना आणि मारुती मंदिरांची स्थापना, त्याचप्रमाणे दासबोध, मनोबोध, मनाचे श्लोक यातून समाजाला केलेले मार्गदर्शन याचे अतिशय सुरेख वर्णन आणि अभिनय दामोदर रामदासी यांनी यावेळी सादर केला. या कार्यक्रमासाठी पार्श्वसंगीत तन्मय महाजन यांचे होते.
या तिन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ भक्त अजय बुवा रामदासी यांनी अतिशय बहारदार पद्धतीने केले. या सर्व सादरीकरणानंतर मान्यवर कलाकारांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, सौ. रसिकाताई ताम्हणकर व योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते करण्यात आला.
या महोत्सवात दिनांक 4 मार्च रोजी ठाणे येथील पं. सुरेश बापट यांचे गायन सादर होणार असून त्यांना संवादिनी साथ नीला सोहनी. ऑर्गन साथ सुशील गद्रे, तबला साथ सुहास चितळे व पखवाजावर गणेश मेस्त्री साथ करणार आहेत.