संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबुधाबी येथे नुकतेच बांधलेले BAPS हिंदू मंदिर रविवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. तर हे मंदिर खुले होताच पहिल्याच दिवशी 65,000 हून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली आहे.
मंदिराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिर उघडताच सकाळी 40 हजार आणि संध्याकाळी 25 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. विशेष सांगायचे झाले तर, भाविकांची एवढी गर्दी असतानाही प्रत्येकजण नियमांचे पालन करत कसलीही धक्काबुक्की न करता दर्शनासाठी रांगेत थांबलेले दिसले.
अबुधाबी येथील भक्त सुमंत राय यांनी सांगितले की, हजारो लोकांमध्ये इतकी उत्तम व्यवस्था मी कधीच पाहिली नाही. मला भिती वाटत होत की, मला खूप वाट पाहावी लागेल आणि शांततेने दर्शन घेता येणार नाही. पण आम्हाला नीट दर्शन घेता आले आणि आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. यासाठी मी BAPS स्वयंसेवक आणि मंदिराच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो.
दरम्यान, मंदिराचे उद्घाटन झाल्याबद्दल मंदिरातील भाविकांनी आनंद व्यक्त केला आणि योग्य व्यवस्था केल्याबद्दल BAPS स्वयंसेवक आणि मंदिराच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. BAPS मंदिर हे अबुधाबीमधील पहिले हिंदू मंदिर आहे. त्याचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते.