देशात आणि राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांमध्ये विविध बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील आणि देशातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली होती. एका ठिकाणी कडाक्याची थंडी आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. दरम्यान देशभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे देशभरात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि दिल्ली येथे विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अजूनही हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर महामार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंदच आहे.
जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. काही भागांमध्ये पावसाबरोबर गारपीट देखील झालेली पाहायला मिळाली. अवकाळी पाऊस आणि भूस्सखलन यामुळे विविध भागांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशासह राज्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही ठिकाणी हवेत गारठा पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळेस थंडी आणि दुपारच्या वेळेस कडक ऊन असे काहीसे वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत.