राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दिली शपथ
उत्तरप्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळाचा आज, मंगळवारी विस्तार करण्यात आला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी 4 नेत्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश राजभर, भाजपचे विधान परिषद सदस्य दारा सिंह चौहान, राष्ट्रीय लोक दलाचे अनिल कुमार आणि भाजपचे आमदार सुनील शर्मा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी चारही मंत्र्यांचे सोशल मिडीयावर अभिनंदन केले.
या शपथविधीनंतर ओमप्रकाश राजभर यांचा मुलगा अरुण राजभर म्हणाला की, मी आणि माझे कुटुंबीय पंतप्रधानांचे आभार मानतो. आमच्या वडिलांनी जो संघर्ष केला तो आज तुमच्यासमोर दिसेल. एका छोट्या आणि गरीब कुटुंबातून आलोय आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही, देशातील जनता आणि वंचित वर्गासाठी राज्यभर लढा देत आहोत. तर ओमप्रकाश राजभर म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती होत आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काम करू आणि राज्यातील सर्व जागा जिंकू अशी ग्वाही त्यांनी दिली. ओमप्रकाश राजभर हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रीही होते पण यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी ते सपा आघाडीत सहभागी झाले होते.