केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी (5 मार्च) रात्री अकोला, जळगाव दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाले. ते मुंबईमध्ये आल्यानंतर ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली.
अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या बैठकीनंतरही महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना हव्या असलेल्या जागा संदर्भात अद्यापही महायुतीत मतभेद आहेत. तसेच यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना हव्या असलेल्या जागाांची यादी भाजपकडे सोपवली होती. पण, ही यादी अजूनही निश्चित झाली नसल्यामुळे काल रात्री त्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. या जागांपैकी 18 जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. तर यंदा याच 22 जागा एकनाथ शिंदे यांना हव्या आहेत. तर अजित पवारांना किमान 10 जागांची अपेक्षा आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सह्याद्रीवरील बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता होती. मात्र, शिंदे गट आणि अजित पवार गटाला हव्या असलेल्या जागांवर बरीच खलबत्ते झाली. तसेच भाजपकडून देखील अनेक जागांवर दावा करण्चात आला, त्यामुळे रात्रीची चर्चा निष्फळ ठरली आहे.