पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (7 मार्च) श्रीनगरला भेट देणार आहेत. तिथे ते कृषी अर्थव्यवस्था आणि पर्यटन उद्योगाला नवीन चालना देण्यासाठी 6400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना भेट देणार आहेत. तसेच उद्या दुपारी पंतप्रधान मोदी बक्षी स्टेडियमला भेट देतील जिथे ते “विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर” या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
काश्मीरच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली येथे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी 2 लाख लोकांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे श्रीनगरमधील बक्षी स्टेडियमभोवती सुमारे 10 हजार तिरंगा आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरमधील कृषी अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांचा सर्वसमावेशक कृषी विकास कार्यक्रम राज्याला समर्पित करतील. ‘होलिस्टिक ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ HADP योजनेअंतर्गत, पंतप्रधान पर्यटन उद्योगाला नवीन चालना देण्यासाठी 1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.
यासोबतच पीएम मोदी ‘देखो अपना देश पीपल्स चॉइस टुरिस्ट डेस्टिनेशन पोल’ आणि ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ लाँच करणार आहेत. तसेच ते चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांचीही घोषणा करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान 1 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप करणार असून महिला लाभार्थी, लखपती दीदी, शेतकरी आणि उद्योगपतींसह विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादही साधणार आहेत.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सुविधा निर्माण करून देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंचा एकूण अनुभव सुधारणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने, पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील आणि 1400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत अनेक उपक्रम सुरू करणार आहेत.