कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरला भेट देणार आहेत. उद्या (7 मार्च) पंतप्रधान मोदी श्रीनगरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करणार असून एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तसेच उद्या दुपारी पंतप्रधान मोदी बक्षी स्टेडियमला भेट देतील जिथे ते “विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर” या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
काश्मीरच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली बक्षी स्टेडियमवर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी 2 लाख लोकांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे श्रीनगरमधील बक्षी स्टेडियमभोवती सुमारे 10 हजार तिरंगा आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत.
अशातच उद्या श्रीनगरमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेपूर्वी काश्मीरमधील लोकांना धमकीचे फोन येत आहेत, ज्यामध्ये स्थानिक लोकांना पंतप्रधानांच्या जाहीर सभेला उपस्थित न राहण्याची धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI काश्मीरमधील मोबाईल आणि लँडलाईनवर पंतप्रधानांच्या रॅलीवर बहिष्कार घालण्यासाठी कॉल करत आहे. काश्मीरमधील लोकांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून कॉल येत आहेत. फोन उचलत असताना लोकांना धमकावले जात आहे आणि उद्याच्या पंतप्रधानांच्या रॅलीपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे. याची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
पीएम मोदींच्या जाहीर सभेत दोन लाखांहून अधिक लोक जमतील असा दावा भाजपने केला आहे. स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी याबाबत ठोस व्यवस्था केली आहे. तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील पॉइंटवर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या काळात सुरक्षेसाठी स्नायपरही तैनात करण्यात येणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरमधील कृषी अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांचा सर्वसमावेशक कृषी विकास कार्यक्रम राज्याला समर्पित करतील. ‘होलिस्टिक ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ HADP योजनेअंतर्गत, पंतप्रधान पर्यटन उद्योगाला नवीन चालना देण्यासाठी 1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.
यासोबतच पीएम मोदी ‘देखो अपना देश पीपल्स चॉइस टुरिस्ट डेस्टिनेशन पोल’ आणि ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ लाँच करणार आहेत. तसेच ते चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांचीही घोषणा करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान 1 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप करणार असून महिला लाभार्थी, लखपती दीदी, शेतकरी आणि उद्योगपतींसह विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादही साधणार आहेत.