गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांमध्ये ही एक निराशाजनक बातमी म्हणावी लागेल. सध्या येणार काळ हा लग्नसराईचा आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे दर वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आजचा सोन्याचा दर जीएसटीसह ६६,८०० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचा दर हा ६७ ते ६८ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात दोन ते तीन हजारांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात २,८०० रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर ६६,८०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. वाढत्या दरामुळे नागरिकांनी देखील सोने खरेदीकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळतेय. अमेरिकेतील फेडरल बँकांनी व्याजदरात कपात केल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे.
तीन दिवसांपूर्वी सोन्याचे दर हे ६४,१०० रुपये होते. तेच दर केवळ तीन दिवसांमध्ये ६६,८०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. आजवरचे सर्वात वाढलेले दर आहेत असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे ७० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे नागरिकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने अनेकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.