पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरमध्ये आले आहेत. आज पंतप्रधान मोदी श्रीनगरमध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण करणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ‘डेव्हलप इंडिया, डेव्हलप जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जेथे कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत.
यामुळे आता बक्षी स्टेडियमच्या बाहेर शेकडो लोक जमले आहेत. तसेच रॅलीचे ठिकाण असलेल्या बक्षी स्टेडियमवर या रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना म्हणाले, “पंतप्रधानांच्या स्वागतासाठी काश्मीरमध्ये प्रचंड उत्साह आहे, ही एक ऐतिहासिक रॅली असेल आणि काश्मीरमधील जनतेचे पंतप्रधानांवर किती प्रेम आहे हे जगाला दिसेल. तसेच काश्मीरमध्ये खूप विकास झाला आहे आणि लोक त्याचे कौतुक करतात. तर या रॅलीमध्ये आम्हाला किमान 2 लाख लोक सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे. पंतप्रधान सबका साथ आणि सबका विश्वास बोलत आहेत आणि आज आपण काश्मीरमध्ये पूर्ण शांतता पाहत आहोत.”
दुसकरीकडे मात्र, पंतप्रधानांनी जनतेला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नसल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख बशीर अहमद यांनी एएनआयला सांगितले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये रॅलीला संबोधित करतील हे चांगले आहे. 15 दिवसांतील ही त्यांची दुसरी रॅली आहे. त्यांनी जम्मूमध्ये रॅलीला संबोधित केले आहे. पण मला वाटते की लोकांची फसवणूक केली जात आहे. भाजपने 2014 आणि 2019 मध्ये प्रचंड जनादेश मिळवून महागाई कमी करण्याचे, बेरोजगारी संपवण्याचे आश्वासन दिले होते, पण ते अजूनही पूर्ण केलेले नाही.”
दरम्यान, दोन आठवड्यांहून अधिक काळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा जम्मू-काश्मीर दौरा आहे. 20 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भेटीदरम्यान जम्मूमध्ये रॅलीला संबोधित केले होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी जवळ येऊन ठेपलेल्या या भेटीला “प्रचंड यशस्वी” करण्यासाठी श्रीनगरमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती बदलल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना, जम्मूचे रहिवासी राजेंद्र यांनी एएनआयला सांगितले, “अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती शांत आहे. मी एक कंत्राटदार आहे आणि आम्ही भारतात काम करायचो. तसेच कलम 370 हटवण्यापूर्वी अनेक मृत्यू होत होते आणि आमचे शेतकरी शांततेत काम करू शकत नव्हते. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी, पाकिस्तानकडून हल्ले झाले की लोक घरे सोडून पळून जायचे पण कलम 370 हटवल्यानंतर हे सर्व थांबले आहे.”