लोणावळ्यामध्ये आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धमकवणाऱ्या सुनील शेळकेंना शरद पवारांनी गंभीर इशारा दिला आहे. लोणावळ्यात होणाऱ्या शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावले आहे, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती. त्यामुळे शरद पवारांनी भरसभेत सुनील शेळकेंना कडक असा इशाला दिला.
सुनीळ शेळकेंना इशारा देताना शरद पवार म्हणाले की, मला समजलं की, तुम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे येतायत म्हणून धमकी दिली. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेव. यापुढे जर असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी कधी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडतही नाही, असा गंभीर इशारा शरद पवारांनी सुनील शेळकेंना दिला आहे.
शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सुनील शेळके म्हणाले की, मावळमधले शकडो कार्यकर्ते अजित पवारांना सोडून शरद पवारांसोबत यायला तयार आहेत, त्यासाठी तुम्ही मावळमध्ये या अशी खोटी माहिती देऊन शरद पवारांना निमंत्रित केलं. तसेच सुनील शेळकेंनी कार्यक्रमाला न जाण्याबाबत कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे शरद पवारांना या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पण या बाबतीत वक्तव्य करताना शरद पवारांनी शहानिशा करणे अपेक्षित होते.
या संदर्भात मी शरद पवारांना भेटून विचारणार आहे. माझी नेमकी काय चूक झाली आहे, हे त्यांनी मला सांगावे. त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली माहिती खरी आहे की खोटी हे तपासून पाहायला हवं होतं. त्यांनी पुढच्या आठ दिवसांमध्ये मी ज्याला फोन केला किंवा दमदाटी केली अशी एक तरी व्यक्ती उभी करावी, नाहीतर मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की, शरद पवारांनी मावळमध्ये येऊन माझ्यावर खोटे आरोप केले. तसेच मी शरद पवारांना आव्हान देतो की, त्यांना ज्यांनी ही माहिती दिली त्यांनी एकतरी पुरावा द्यावा नाहीतर मी शरद पवारांनी माझ्या बाबतीत केलेले वक्तव्य खोटं होतं असे सांगावं, असेही सुनील शेळके म्हणाले.