आज (7 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ‘डेव्हलप इंडिया, डेव्हलप जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमात एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. जम्मू आणि काश्मीर आज विकासाच्या नवीन उंची गाठत आहे आणि मोकळा श्वास घेत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, हा प्रदेश पर्यटनाचे सर्व विक्रम मोडत आहे. तसेच आज जम्मू आणि काश्मीर विकासाच्या नवीन उंचीला स्पर्श करत आहे कारण जम्मू आणि काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर निर्बंधांपासून हे स्वातंत्र्य मिळाले आहे.”
पुढे ते म्हणाले, कलम 370 बाबत काही कुटुंबांकडून दिशाभूल केल्याचे सत्य लोकांना कळले आहे. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जम्मू-काश्मीर आणि देशातील लोकांची अनेक दशकांपासून कलम 370 वरून दिशाभूल केली आहे.
“राजकीय फायद्यासाठी अनेक दशकांपासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 370 च्या नावाखाली जम्मू-काश्मीरमधील जनतेची आणि देशाची दिशाभूल केली. जम्मू-काश्मीरला कलम 370 चा फायदा झाला की काही राजकीय कुटुंबे त्याचा फायदा घेत आहेत? जम्मू-काश्मीरच्या लोकांना सत्य समजले आहे की त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे.आज कलम 370 नाही, त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या प्रतिभेचा पूर्ण आदर केला जात आहे आणि त्यांना नवीन संधी मिळत आहेत. आज येथे प्रत्येकासाठी समान हक्क आणि समान संधी आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“2014 नंतर जेव्हाही मी इथे आलो, तेव्हा मी नेहमी म्हणालो की मी फक्त तुमची मने जिंकण्यासाठी मेहनत करत आहे. मी हे सर्व कष्ट तुमचे मन जिंकण्यासाठी करत आहे आणि मला विश्वास आहे की मी योग्य मार्गावर आहे. तसेच मी कठोर परिश्रम करत राहीन, ही मोदींची हमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ‘मोदी की हमी’ म्हणजे हमी पूर्ण करण्याची हमी आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्या हृदयात राहतात आणि ‘मैं हूं मोदी का परिवार’ काश्मिरींच्या हृदयात आहे. मी वचन देतो की जम्मू-काश्मीरमधील विकास कामे कोणत्याही किंमतीवर थांबणार नाहीत. येत्या काही दिवसांत रमजान येत आहे. यानिमित्ताने मी देशातील जनतेला रमजानच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. तसेच उद्या आपण महा शिवरात्री साजरी करू आणि मी देशातील जनतेलाही महा शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो.”
पीएम मोदींनी जम्मू-काश्मीरच्या तलावांमध्ये फुललेल्या कमळाचाही उल्लेख केला आणि ते भाजपचे प्रतीक असल्याचे नमूद केले. “भविष्यात, जम्मू-काश्मीरची यशोगाथा जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. तसेच येथील तलावांमध्ये सर्वत्र कमळ दिसत आहेत. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या लोगोमध्येही कमळ आहे. भाजपचे निवडणूक चिन्हही कमळ आहे आणि जम्मू-काश्मीरचा कमळाशी सखोल संबंध आहे हा योगायोग आहे की निसर्गाचे लक्षण?” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.