आज (8 मार्च) संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी महिलांना आवाहन देखील केले आहे. ते धाराशिव येथे एका सोहळ्याला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावे हे मला कळत नाहीये. कारण सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी मेरा परिवार जाहीर केलं आहे, मग यामध्ये मणिपूरच्या महिला येत नाहीत का? आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू येत नाहीत का? अशी महिलांची हालत बघितल्यानंतर त्यांना शुभेच्छा तरी काय देऊ.
मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतो की, तुम्ही आता महिषासूरमर्दिनी बना आणि देशातील हुकुमशहा संपवा. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी देशातील सर्व महिलांना आम्ही वंदन करतो, विनंती करतो आणि पुढच्या लढाईच्या यशासाठी आशीर्वाद मागतो. तसेच ही लढाई मोठी आहे त्यामुळे कुठेही फसू नका आणि विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, काल मी धाराशिवमध्ये येऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्या तुळजाभवानीचे तुम्ही रूप आहात. आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे, कारण ज्या ज्या वेळेला आसूर माजले त्यावेळी जगदंबेने अवतार घेतले होते त्यामुळे आपण तिला महिषासूर मर्दिनी म्हणतो”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.