आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आज पहाटे मोदी यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली. त्यानंतर जोरहाटमध्ये प्रसिद्ध अहोम जनरल लचित बारफुकन यांच्या १२५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ शौर्य’चे उद्घाटन केले आहे.
पंतप्रधान अनेक राज्यांमध्ये हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची झंझावाती शैलीत उद्घाटन,आणि पायाभरणी करणार आहेत . या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ५५,६०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यांमध्ये विकासकामांचा धडका लावला आहे.त्या दरम्यान या दौऱ्याला महत्त्व आहे कारण पंतप्रधान या क्षेत्रातील सर्वात मोठे शहर सिलीगुडी येथे 4,500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. याशिवाय, ते भाजपच्या एका मेळाव्याला संबोधित करणार आहेत, ज्यात राज्यात पक्षाची मजबूत उपस्थिती दिसून येईल.
या भेटीतील प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अनेक रेल्वे लाईन विद्युतीकरण प्रकल्पांचे उद्घाटन, ज्याचा उत्तर पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागातील लोकांना महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.बहुप्रतिक्षित बरौनी-गुवाहाटी नॅचरल गॅस पाईपलाईन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम दौऱ्यात उद्घाटन होणार आहे. GAIL (India) Ltd द्वारे कार्यान्वित केलेला हा प्रकल्प, ईशान्य क्षेत्राला राष्ट्रीय गॅस ग्रीडशी जोडेल, जो देशाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
तसेच यादरम्यान पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशात १३,००० फूट उंचीवर बांधलेल्या सेला बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत.