शरद पवार यांच्याकडून बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सुप्रिया सुळेंनंतर आता महाविकास आघाडीतील आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी जुहू येथील एका कार्यक्रमात बोलताना अमोल किर्तीकर हे लोकसभा उमेदवार असणार असल्याची घोषणा केली आहे.
ठाकरे गटाला मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता स्वत: उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित केला आहे. “अमोल किर्तीकर हे आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचे आहे”, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले आहे.
मुंबईमधील सहा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी संपूर्ण राज्यभर दौरे सुरू केले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीसाठ त्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार देखील जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये आता त्यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल किर्तीकरांची उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष सांगायचे म्हणजे, अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर हे शिंद गटात आहेत. तसेच सध्या गजानन किर्तीकर हे उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे आता अमोल किर्तीकरांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.