आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. अभिनेत्री संभावना सेठ हिने आम आदमी पार्टी सोडण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तिने याबाबतची घोषणा केली आहे.
अभिनेत्री संभावना सेठने X वर पोस्ट करून आम आदमी पार्टी सोडल्याची घोषणा केली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, मला आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊन एक वर्ष झाले आहे. एक वर्षापूर्वी आपल्या देशाची सेवा करण्याचा खूप उत्साह होता, परंतु आपण कितीही शहाणपणाने निर्णय घेतला तरीही आपण चुकू शकता कारण शेवटी आपण माणूस आहोत. माझी चूक लक्षात आल्याने मी अधिकृतपणे ‘आप’मधून बाहेर पडण्याची घोषणा करत आहे. यासोबतच तिने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि डॉ. संदीप पाठक यांना टॅग केले आहे.
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठने जानेवारी 2023 मध्ये आप पक्षाचे सदस्यत्व घेतले होते. त्यावेळी संभावना सेठला आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले होते. अशातच आता संभावानने आप पक्षाला रामराम केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीला काही दिवस उरलेले आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. आम आदमी पार्टी यावेळी इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढवत आहे. आम आदमी पार्टी दिल्लीत 4 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर हरियाणातील एका जागेवर आपने उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.