पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गाव सध्या चर्चेत आहे. शाहजहान शेख याने जमिनीवर कब्जा करण्यासोबतच काही महिलांचे लैंगिक शोषणही केल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे. बंगालचे संपूर्ण राजकारण सध्या संदेशखालीभोवती फिरत आहे. मात्र, अलीकडेच शाहजहानला अटक करण्यात आली.
आज शाहजहानला बशीरहाट न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीदरम्यान त्याला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. संदेशखाली येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीबीआयने पुढील तपासासाठी कोठडी मागितली होती. तर ती न्यायालयाने मान्य केली आहे.
बंगाल सरकारला बुधवारी कोलकाता उच्च न्यायालयाने शाहजहानला सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी केंद्रीय सुरक्षा दलासह सीबीआय दाखल झाले होते. तर यापूर्वी सीआयडीचे पथक शाहजहानला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले होते.
या प्रकरणी भाजप खासदार दिलीप घोष हे आरोपी शाहजहान शेख आणि टीएमसीवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. ते म्हणाले, ‘राज्य सरकार आणि टीएमसी अजूनही शाहजहानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्याला सीबीआयकडून हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र न्यायालयीन कारवाई सुरूच राहणार असून तपास सुरू आहे. हळूहळू सर्वकाही उघड होईल.