पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता इंडिया आघाडीला आणखी झटका देणारी बातमी समोर आली आहे. झारखंडमध्ये एका मोठ्या पक्षाने इंडिया आघाडीची साथ सोडली आहे.
झारखंडमध्ये इंडिया आघाडीतून भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच CPI ने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सांगितले की, 14 पैकी 8 जागांवर आम्ही एकटे निवडणूक लढवणार आहोत. तसेच या पक्षाने हा मोठा निर्णय काल जाहीर केला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिन महेंद्र पाठक यांनी पीटीआयशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली असून अजूनही काँग्रेसने जागावाटपाबाबत चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहोत.
झारखंड प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता जमशेटपूर, रांची, चतरा, हजारीबाग, पलामू, कोडरमा, गिरीडीह, दुमका या जागांवर सीपीआय उमेदवार देणार आहे. तसेच या उमेदवारांची घोषणा 16 मार्चनंतर करण्यात येणार आहे, असेही महेंद्र पाठक यांनी सांगितले.