देशातील वातावरण काही दिवसांपासून बदलताना पाहायला मिळत आहे. वेब डिस्टर्बन्समुळे वातावरणात बदल होताना दिसत आहेत. हवामानातील बदलामुळे मागील आठवड्यात थंडी, कडकी उन्हाळा आणि अवकाळी पावसाचा फटका काही भागांना बसला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हिमालयीन प्रदेशामध्ये हुकला ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच बर्फवृष्टी होण्याचा देखील अंदाज वर्तविण्यात आला आहे. मैदानी प्रदेशात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णता वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील काही ठिकाणी कडक उन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या उन्हामुळे आतापासून नागरिकांना हैराण केले आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामान बघायला मिळतंय. उन्हाचे चटके लागत असल्याने घराबाहेर जाणे त्रासदायक होत आहे. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि दक्षिण भारतात हवेचा कमी दाबाचा पत्ता निर्माण झाला आहे. पंजाब, हरियाणा , उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूर, मिझोराम व त्रिपुरा राज्यांमध्ये हलक्या पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर या भागांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे देशभरात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि काही ठिकाणी देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी राजाची चिंता वाढली आहे.