आज सकाळी ईडीची टीम छापे टाकण्यासाठी झारखंडमधील काँग्रेस महिला आमदार अंबा प्रसाद यांच्या रांची येथील निवासस्थानी पोहोचली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अंबा प्रसाद यांच्या घरावर छापा टाकला, सोबतच त्यांच्या इतर नातेवाईकांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने रांची, हजारीबागसह सुमारे 17 ठिकाणी तपास सुरू केला आहे. तसेच आज सकाळी ईडी अधिकाऱ्यांचे पथक अंबा प्रसाद यांच्या निवासस्थानी पोहोलचे. तर सध्या अंबा प्रसाद यांच्याविरोधात एक नव्हे तर अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
ईडीचे अधिकारी नेमक्या कोणत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची आणि हजारीबागशिवाय बरकागावमध्येही ईडीची चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी अंबा प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. तसेच विविध कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबा प्रसाद यांचे काका आणि काही जवळच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवरही ईडीची छापेमारी सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद या झारखंडमधील सर्वात तरुण आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या झारखंडच्या बरकागाव मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.