काल (10 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक असल्याचा मोठा निर्णय बैठकीत घेण्यात आल आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान राज्याच्या महिला आणि बालकल्याण खात्याकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता यापुढे सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे देखील नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर या मातृ्त्वाचा सन्मान करणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाची सुरूवात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
या ऐतिहासिक निर्णयाची सुरूवात केल्याबाबतची एक खास पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी X वर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आई एक नाव असतं.. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं… कवी फ.मु. शिंदे यांच्या कवितेच्या ओळींमधून आईची महती आपल्याला समजते. आपल्याला जन्म देण्यापासून आपल्याला मोठे करण्यात ज्या माऊलीचा सिंहाचा वाटा असतो तिला तिचं श्रेय देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.”
https://twitter.com/mieknathshinde/status/1767428216350753121
“यापुढे प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची सुरुवात मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. आई नावाची शिदोरी सरत नसली तरी प्रत्येकासोबत नक्की उरावी यासाठी राज्य शासनाने घेतलेला हा एक पथदर्शी निर्णय असून त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करत आहोत”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनीही या ऐतिहासिक निर्णयाची सुरूवात केली आहे. कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर तिन्ही मंत्र्यांनी आपल्या नावाच्या पुढे आईच्या नावाचाही उल्लेख असलेल्या पाट्या हातात घेत या निर्णयाचे स्वागत केले.