नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांनंतर भाजपने नायब सिंह सैनी यांची विधिमंडळ पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून घोषणा केली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नायब सिंह सैनी यांनी मनोहर लाल खट्टर यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. तसेच भाजप नेते कंवर पाल गुजर यांनी हरियाणाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.
कुरुक्षेत्रचे लोकसभा खासदार नायब सिंह सैनी हे ओबीसी समाजाचे आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची हरियाणा भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच सैनी हे मनोहर लाल खट्टर यांच्या जवळचे मानले जातात.
नायब सिंह सैनी यांची राजकीय कारकीर्द सुमारे तीन दशकांपूर्वी सुरू झाली, जेव्हा त्यांनी हरियाणात भाजप संघटना मजबूत करण्याचे काम केले. ते 2002 मध्ये अंबाला येथील भाजप युवा शाखेचे जिल्हा सरचिटणीस झाले आणि 2005 मध्ये त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पक्षाच्या अनेक शाखांमध्ये काम केले आहे, ज्यात शेतकरी मोर्चा किसान मोर्चाचा समावेश आहे. ते किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होते. तर त्यांची 2012 मध्ये अंबाला येथे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली होती.
2014 च्या राज्य निवडणुकीत सैनी नारायणगडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. तर 2016 मध्ये त्यांची राज्यमंत्रीपदी निवड झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सैनी यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँग्रेसच्या निर्मल सिंह यांचा सुमारे चार लाख मतांनी पराभव केला होता.