सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहु लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी जोरात तयारी केली असून राज्यात दौरे, सभा यांना सुरूवात झाली आहे. पण, लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही राज्यासह देशभरात जागावाटपांचा तिढा दिसून येतोय. अशातच आता महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करत आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे म्हटले जात आहे.
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. एनडीटीव्ही सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 31 जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार आहे. तर शिवसेनेला 13 जागा देण्यात आल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा देण्यात आल्या आहेत. बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी या चार जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.
भाजपने शिवसेनेला राज्यातील 13 जागा देताना त्यात एका जागेचा बदल केला आहे. यामध्ये एका मतदारसंघात उमेदवाराचा बदल केला आहे. भाजपने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ घेतला असून त्या बदल्यात शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ देण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यातील 48 लोकसभा मतदार संघातील प्रत्येक उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे. तसेच आता तिन्ही पक्षांचे जागावाटप येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.